यवतमाळमध्ये गॅस टंचाईच्या अफवा; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण – पुरेसा साठा उपलब्ध

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात घरगुती गॅस टंचाईच्या अफवा पसरत असतानाच जिल्हा प्रशासनाने परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून गॅस वितरण सुरळीत सुरू असल्याचे सांगितले आहे.
गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सी प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत गॅसचा साठा, वितरण व्यवस्था तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
दरम्यान, गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके नियुक्त केली आहेत. जर कुठेही गॅस सिलेंडरच्या विक्रीत अनियमितता आढळून आली तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.



