महाराष्ट्रात डॉक्टरला सायबर फसवणूक; रजिस्ट्रेशनच्या आमिषाने एक लाखांची उकळपट्टी

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना आता अशाच एका सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विदेशातून शिक्षण पूर्ण करून भारतात परतलेल्या एका डॉक्टरला महाराष्ट्रात प्रॅक्टिससाठी रजिस्ट्रेशन करून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्याने तब्बल एक लाख रुपयांची फसवणूक केली आहे. बनावट प्रमाणपत्र पाठवून ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित डॉक्टर काही वर्षांपूर्वी विदेशात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून जवळपास चार वर्षे तेथे वैद्यकीय सेवा देत होते. त्यानंतर ते भारतात परतले. महाराष्ट्रात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी अधिकृत रजिस्ट्रेशन आवश्यक असल्याने त्यांनी त्याबाबत माहिती शोधण्यास सुरुवात केली.
दरम्यान, सोशल मीडियावर त्यांना एक लिंक दिसली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांचा संपर्क एका व्यक्तीसोबत झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. त्या व्यक्तीने महाराष्ट्रात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले.
यानंतर त्या व्यक्तीने डॉक्टरकडून आवश्यक कागदपत्रे मागवून घेतली. डॉक्टरांनी आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले. काही दिवसांनी त्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन मंजूर झाल्याचे सांगत बनावट प्रमाणपत्र पाठवले आणि डॉक्टरला आता प्रॅक्टिस करता येईल असा विश्वास दिला.
यानंतर अॅडव्हान्स म्हणून एक लाख रुपये पाठवण्याची मागणी करण्यात आली. विश्वास ठेवून डॉक्टरांनी एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर मिळालेली कागदपत्रे तपासल्यानंतर ती पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की त्यांची सायबर फसवणूक झाली आहे.
यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.



