नागपुरात वाहनचोर अटकेत; चार चोरीच्या दुचाकी जप्त, १.३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूरमध्ये वाहन चोरट्याविरोधात बजाजनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी चोरीच्या प्रकरणात एका सराईत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या दुचाकींच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक केली होती. त्याची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी आरोपीला प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची पोलीस कोठडीत सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपी टाळाटाळ करत होता; मात्र चौकशीदरम्यान त्याने बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रवेश कन्हैयालाल कंगाले (वय ३८) असे आहे.
आरोपीच्या कबुलीच्या आधारे पोलिसांनी चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपीने चोरी केल्यानंतर या गाड्यांची विक्री केली नव्हती, तर त्या बेवारस अवस्थेत सोडून दिल्या होत्या. त्यामुळे या चोरीमागे कोणताही आर्थिक हेतू नसल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असावा किंवा केवळ विकृत आनंदासाठी हे कृत्य करत असावा, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



