दारूसाठी पैशांवरून वाद; अमरावतीत मुलानेच वडिलांचा केला खून

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाणे हद्दीत नात्यांना हादरवून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच वडिलांचा लाकडी दांड्याने प्रहार करून खून केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्चच्या मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास गोपाल नगर परिसरातील मत्स्यगंधा कॉलनीमध्ये ही घटना घडली. मनोहर मधुकर बोरकर (वय ५५) हे आपल्या घरी असताना त्यांचा मुलगा राहुल मनोहर बोरकर (वय ३०) याने दारू पिण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात आरोपी राहुल बोरकर याने लाकडी दांड्याने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात मनोहर बोरकर गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ डीबी पथकाने तातडीने तपास करत १३ मार्चच्या सकाळी आरोपी राहुल बोरकर याला ताब्यात घेतले. ही कारवाई डीबी पथक प्रमुख मनीष करपे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.



