इराण–इजराइल युद्धाचा परिणाम; अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण आणि इजराइल यांच्यातील संघर्षाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे सकाळपासूनच अनेक नागरिक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिलेंडर मिळेल या अपेक्षेने नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीसमोर जमा होत असल्याने काही ठिकाणी गर्दीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार समोर येत आहे. याशिवाय ऑनलाइन गॅस बुकिंग सेवा देखील अनेक ठिकाणी बंद पडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना थेट गॅस एजन्सीवर जाऊन चौकशी करावी लागत आहे.
या परिस्थितीमुळे अनेक घरांमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत असले तरी नागरिकांना मात्र या परिस्थितीचा फटका बसत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.



