अमरावतीत बेकायदेशीर हातभट्टी दारूवर पोलिसांचा छापा; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेचे पथक नियमित गस्त घालत असताना बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भोईपुरा-वडाळी परिसरातील एका घरावर तात्काळ छापा टाकत कारवाई केली.
छाप्यादरम्यान कमला वामनराव चाचरकार (वय ६५) या महिला त्यांच्या घरात हातभट्टी दारू तयार करताना आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता सुमारे ५५ लिटर हातभट्टी दारू तसेच ९० लिटर मोहमास सडवा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्यही पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी घटनास्थळीच काही साहित्य नष्ट केले असून एकूण ४१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क), (फ) आणि (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अमरावती शहरात बेकायदेशीर दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सतत गस्त वाढवून अशा प्रकारच्या कारवाया सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.



