BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

NGT च्या आदेशानंतरही भंडाऱ्यात वाळू माफियांचा धुमाकूळ; कातखेडा घाटावर बेकायदेशीर उपसा उघड

भंडारा :
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) यांच्या स्पष्ट आदेशानंतरही भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता वाळू माफिया मात्र तेथून फरार झाल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील सर्व वाळू घाट बंद ठेवण्याचे आदेश NGT कडून देण्यात आले आहेत. मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करत काही वाळू माफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत असल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार पवनी तालुक्यातील कातखेडा वाळू घाट परिसरात उघडकीस आला. कातखेडा वाळू घाट हा एका खाजगी कंपनीला देण्यात आला असला तरी सध्या जिल्ह्यात वाळू उपसा पूर्णपणे बंद आहे. तरीदेखील रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू काढली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.

ही माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी पाठवली. मात्र अधिकारी पोहोचण्यापूर्वीच वाळू माफिया तेथून फरार झाले. घटनास्थळी कोणतेही वाहन आढळून आले नाही. मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याचे स्पष्ट चिन्ह दिसून आले.

प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण परिस्थितीची नोंद केली आहे. तसेच या प्रकरणात संबंधित घाट मालकांकडून खुलासा मागविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खाणीकर्म विभागाने दिला आहे.

दरम्यान, NGT च्या आदेशानंतरही सुरू असलेला हा बेकायदेशीर वाळू उपसा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button