महिला व्यापाऱ्याकडून खंडणी वसुलीसाठी गुंडाला सुपारी; दोन दिवसांत ६५ लाख न दिल्यास जीवे मारण्याची धमकी

नागपूर :
नागपूरच्या लाकडगंज परिसरात एका महिला व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी गुंडाला सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कुख्यात गुंड दिलीप कोसुरकरसह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी नीलम नावाच्या महिला व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायासाठी ५० लाख रुपये उधार घेतले होते. मात्र व्यवसायात मंदी आल्यामुळे संपूर्ण रक्कम वेळेत परत करता आली नाही. त्यापैकी सुमारे ४५ लाख रुपये त्यांनी परत केल्याचे सांगितले जात असून उर्वरित रकमेबाबतचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान, या वादाची माहिती असलेल्या एका मध्यस्थाने याचा फायदा घेत छापरू नगर येथील कुख्यात गुंड दिलीप कोसुरकर याला खंडणी वसुलीसाठी सुपारी दिल्याचा आरोप आहे. शनिवारी दुपारी आरोपी अक्षय चांभारे हा महिला व्यापाऱ्याच्या घरी पोहोचला आणि फोनवरून कोसुरकरशी तिची बोलणी करून दिली.
यावेळी कोसुरकरने फोनवरून शिवीगाळ करत दोन दिवसांच्या आत व्याजासह ६५ लाख रुपये देण्याची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिला व्यापाऱ्यांनी मंगळवारी लाकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच संबंधितांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



