BhandaraCity CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

पवनीत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा स्वतःच्या अपहरणाचा बनाव; शाळेतील वाद लपवण्यासाठी रचली खोटी कथा

भंडारा :
भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील किरकोळ वाद लपवण्यासाठी या विद्यार्थ्याने किडनॅपिंगची खोटी कथा तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवनी येथील आनंदम विद्यामंदिर शाळेत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील टेबलवर काही अभद्र शब्द लिहिले. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावण्यास सांगितले.

मात्र पालक रागावतील किंवा शिक्षा करतील या भीतीने विद्यार्थी घाबरला. या भीतीतून मार्ग काढण्यासाठी त्याने मोबाईलवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आणि अखेर स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्याने आपल्या आईला फोन करून बसस्टॉपवर उभा असताना एका अनोळखी व्यक्तीने चाकूच्या धाकावर आपले अपहरण केल्याचे सांगितले. तसेच नाकावर रुमाल ठेवून बेशुद्ध केले आणि नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडजवळील एका मंदिराजवळ शुद्ध आल्यावर आरडाओरडा केल्यामुळे अपहरणकर्ते पळून गेल्याची कथा त्याने आईला सांगितली.

मात्र या कथेबाबत संशय आल्याने पालकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये अपहरणासारखी कोणतीही घटना दिसून आली नाही. यानंतर पालक आणि पोलिसांनी विद्यार्थ्याची सखोल चौकशी केली असता अखेर त्याने भीतीपोटी हा खोटा बनाव रचल्याची कबुली दिली.

दरम्यान, या घटनेनंतर मुलांमध्ये वाढता मोबाईल वापर, मानसिक तणाव तसेच पालक आणि मुलांमधील संवादाचा अभाव यासारखे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणाबाबत माहिती देताना निलेश ब्राम्हणे यांनी पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button