अमरावती महानगरपालिकेची थकीत करावर धडक कारवाई; दोन मालमत्तांवर सील

अमरावती :
अमरावती शहरात थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अमरावती महानगरपालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. कर न भरल्यामुळे दोन मालमत्तांवर सील लावण्यात आले असून शहरात थकबाकीदारांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या झोन क्रमांक तीन अंतर्गत दस्तूर नगर येथील भूमिपुत्र कॉलनीमधील अमरावती जिल्हा दूध उत्पादन सहकारी संस्थेच्या वास्तूवर थकीत करामुळे सीलची कारवाई करण्यात आली. तसेच एमआयडीसी रोडवरील हॉटेल लॉर्डस या हॉटेलने सुमारे सात लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्यामुळे त्या हॉटेललाही सील लावण्यात आले.
महानगरपालिकेकडून वारंवार सूचना देऊनही संबंधितांकडून कर भरला गेला नसल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेने मोहीम अधिक तीव्र केली आहे.
दरम्यान, आगामी काळात शहरातील इतर थकबाकीदार मालमत्तांवरही जप्ती व सीलची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर तातडीने भरून कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



