अमरावतीत ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; गुन्हे शाखेकडून ९.३० लाखांची एमडी जप्त

अमरावती :
अमरावती शहरात ड्रग्सविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांची एमडी ड्रग्स जप्त केली आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सध्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अटक आरोपी शेख नजीम शेख रहीम याने पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील कारवाई केली. अधिकाऱ्यांनी दोन पंच आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गवळीपुरा परिसरातील आरोपीच्या घराची झडती घेतली.
या झडतीदरम्यान सुमारे ६२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या ड्रग्सची अंदाजे किंमत ९ लाख ३० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू आहे.



