भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर सट्टा

नागपूरमध्ये क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टेबाजीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने छापा टाकत दोन आरोपींना रंगेहात पकडले असून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग समोर आला असून पुढील तपास सुरू आहे.
नागपूर शहरात क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टेबाजीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ ने धडक कारवाई केली आहे. ८ मार्च २०२६ रोजी रात्री ९.२० ते ९ मार्च रोजी पहाटे १२.२० या दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की मानकापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाकरे ले-आऊट, गीता नगर येथील फरस चौकाजवळील एका घराच्या वरच्या मजल्यावर काही इसम टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यावर सट्टा लावत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान एका खोलीत दोन आरोपी मोबाईल फोनच्या माध्यमातून ग्राहकांकडून क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करताना पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी चैतन्यकुमार गंगाराम ठाकरे वय ५५ वर्षे आणि पुरुषोत्तम दशरथ सोनकुसरे वय ५३ वर्षे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक टीव्ही, विविध कंपन्यांचे १० मोबाईल फोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण अंदाजे १ लाख ३८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत या सट्टेबाजीमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यामध्ये संजू रामटेकेकर, हेमराज नामदेवराव कोहाड आणि अविनाश खडके यांचा समावेश आहे. या प्रकरणी मानकापुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नागपूरमध्ये क्रिकेट सट्टेबाजीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध जुगाराच्या नेटवर्कवर मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांचा तपास सुरू आहे.



