अकोल्यात दोन समुदायांमध्ये दगडफेक; पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात

अकोला शहरात रविवारी रात्री जुन्या शहर भागात दोन समुदायांमध्ये वाद उफाळून आला असून गाली-गलौजीनंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
अकोला शहरातील जुना शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सोंटक्के प्लॉट आणि गाडगे नगर परिसरात रविवारी रात्री अचानक तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन समुदायांतील काही तरुणांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. हा वाद काही वेळातच वाढत गेला आणि एकमेकांमध्ये गाली-गलौज सुरू झाली. याच दरम्यान काही युवक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली असून त्यांनी अचानक एकमेकांवर दगडफेक सुरू केली.
दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही बाजूंच्या लोकांना वेगळे करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र एका व्यक्तीच्या छातीवर दगड लागल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी काही असामाजिक तत्व शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी जुना शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून लवकरच संबंधित आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस सतत गस्त घालत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या अकोला शहरात शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



