India NewsLatest News

होळीच्या उत्सवात दुर्दैवी घटना; डीजेवर नाचताना २९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

इटावा (वृत्तसंस्था) :
देशभरात होळीचा उत्साह शिगेला असताना उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. होळीच्या उत्सवात डीजेवर नाचत असताना २९ वर्षीय तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इटावा जिल्ह्यातील लवेदी परिसरातील नंदगाव गावात बुधवारी घडली. गावात होळीचा उत्सव सुरू होता. ग्रामस्थ एकमेकांना गुलाल लावत होते आणि डीजेच्या तालावर नाचत होते. याच वेळी गावातील राजकुमार उर्फ टिंकू (वय २९) हा आपल्या मित्रांसोबत डान्स करत होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नाचत असताना अचानक राजकुमारचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. सुरुवातीला उपस्थितांना तो मजाक करत आहे किंवा घसरून पडला असे वाटले. मात्र तो उठत नसल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

मित्रांनी तातडीने त्याला उचलून बकेवर येथील ५० खाटांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे.

राजकुमारच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात ७ वर्षांचा मुलगा बंशू आणि अवघी २ वर्षांची मुलगी बंशिका असा परिवार आहे. पत्नी रागिनी, वडील प्रमोद आणि काका बबलू यांचा रडवेला आक्रोश पाहून गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. काही वेळापूर्वी सगळ्यांसोबत रंग खेळणारा राजकुमार आता कायमचा निघून गेल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button