शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला; तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाकडून सुखरूप रेस्क्यू

यवतमाळ (प्रतिनिधी) :
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात एक थरारक घटना समोर आली आहे. शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या अचानक शेतातील विहिरीत पडल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने सुमारे तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश मिळवले.
नेर तालुक्यातील बाणगाव आणि चिकणी डोमगा शिवारात ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेला मादी जातीचा बिबट्या शेतातील विहिरीत पडला. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. ही विहीर बेबी रमेश राठोड यांच्या गट क्रमांक १८/२ या शेतात असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या बचाव मोहिमेत बाणगाव येथील मिधून राठोड यांनीही सहकार्य केले.
यवतमाळ येथील मानद वन्यजीव संरक्षक पथकातील श्याम जोशी, अनिकेत गवांदे, योगेश मारबते, केतन पिल्लारे, शिवण भट, कामेश भोयर, झुलेश मेश्राम तसेच वाहनचालक संजय माहूरकर आणि शुभम चव्हाण यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी जाळी, दोरखंड आणि विशेष पिंजऱ्याचा वापर करण्यात आला.
बिबट्या आक्रमक होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेत बचावकार्य काळजीपूर्वक पार पाडण्यात आले. अखेर सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाला बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आली. पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला योग्य त्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांनी दिली. तसेच अशा घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.



