ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष; ६० विद्यार्थ्यांची लाखोंची फसवणूक, कागदपत्रे घेऊन ठग फरार

Kalyan – Dombivli परिसरात विद्यार्थ्यांना लक्ष्य करत ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सुमारे ६० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी १८ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. ठगांनी विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्डसह इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतली.
यानंतर ट्रेडिंग अकाउंट उघडण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसेही उकळले. सुरुवातीला मोठा नफा मिळणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना विश्वासात घेण्यात आले. मात्र काही दिवसांनी ठगांनी संपर्क तोडत विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
या घटनेनंतर फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये, तसेच कोणालाही आपली वैयक्तिक कागदपत्रे किंवा आर्थिक माहिती देताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



