होळी–धुलीवंदन पार्श्वभूमीवर अमरावतीत वाहतूक विभागाची धडक कारवाई; ७०९ वाहनचालकांवर गुन्हे

अमरावती :
होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारी गर्दी आणि वाहतूक लक्षात घेता अमरावती शहर वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. राजापेठ, गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा वाहतूक विभागाकडून नाकाबंदी व विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ७०९ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी होळी आणि ०३ मार्च २०२६ रोजी धुलीवंदन सण असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरावती शहर वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली. पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त (मुख्यालय), अमरावती शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स.पो.आ. (वाहतूक) संजय खताळे यांच्या सूचनेनुसार राजापेठ, गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा वाहतूक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात विशेष नाकाबंदी केली.
या मोहिमेदरम्यान पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली —
- दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १८ चालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत कारवाई.
- ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ३७३ चालकांवर कलम १२८(१)/१९४(C) अंतर्गत कारवाई.
- मॉडिफाय सायलेंसर वापरणाऱ्या २ वाहनांवर कलम १९८ अंतर्गत कारवाई.
- वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणाऱ्या ३१ चालकांवर कलम १८४(C) अंतर्गत कारवाई.
- विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या २३ चालकांवर कलम ११९/१७७ अंतर्गत कारवाई.
- तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
एकूण ७०९ वाहनचालकांवर कारवाई करत वाहतूक विभागाने सणाच्या काळात शिस्तबद्ध वाहतूक आणि अपघातमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
वाहतूक विभागाच्या वतीने सर्व वाहनधारकांना हेल्मेट आणि सीटबेल्टचा नियमित वापर करण्याचे, वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे आणि मोटार वाहन कायद्याचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील तसेच आर्थिक दंडापासूनही बचाव होऊ शकतो.
होळी आणि धुलीवंदन सण आनंदात आणि सुरक्षिततेत साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मात्र नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. सुरक्षित राहा, नियम पाळा आणि सण साजरा करा आनंदात!



