लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळून अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कराडमध्ये होळीच्या दिवशी दुर्दैवी घटना

कराड :
होळीच्या दिवशी आनंदोत्सवावर दुःखाची सावली पडली आहे. लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कराडमधील रिमांड होमच्या पाठीमागील एका कॉलनीत मंगळवारी रात्री घडली.
मृत चिमुकल्याचे नाव विघ्नेश वल्लभ मुळे असे असून, या घटनेमुळे मुळे दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील रिमांड होमच्या पाठीमागील कॉलनी परिसरात खेळत असताना अचानक लोखंडी प्रवेशद्वार चिमुकल्या विघ्नेशच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या अचानक घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत विघ्नेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या हृदयद्रावक घटनेने मुळे कुटुंबासह संपूर्ण भोई समाजावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सणाच्या दिवशी घडलेली ही दुर्घटना सर्वांसाठीच धक्का देणारी ठरली आहे. अशा घटना टाळण्यासाठी घर आणि परिसरातील धोकादायक संरचनांची वेळोवेळी तपासणी करणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या घटनेने करून दिली आहे.



