तिरुपतीला जात असलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला कारची धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

चित्तूर (आंध्र प्रदेश) :
आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्हा येथे बुधवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. तिरुपतीला जात असलेली एक कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील कुटुंब हे बेंगळुरू येथील रहिवासी होते. हे सर्वजण तिरुपतीकडे निघाले होते. बुधवारी सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पालामनेरू जवळील चार लेन महामार्गावर हा अपघात घडला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेंगळुरूहून तिरुपतीकडे जात असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिरुपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



