वाशिम बसस्थानकांवर एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी गर्दी; शुल्कामुळे महिलांमध्ये नाराजी

वाशिम (प्रतिनिधी): वाशिम जिल्ह्यातील बस स्थानकांवर सध्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एसटी प्रवासातील विविध सवलती कॅशलेस आणि पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी राज्य सरकारने एनसीएमसी (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, हे कार्ड काढण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आणि प्रक्रिया यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) तिकिटांवरील सवलती अधिक पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर हे कार्ड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
एसटीमध्ये ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक, ५ ते ७५ वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान’ योजनेअंतर्गत अर्ध तिकिट, तर दिव्यांग प्रवाशांना विशेष सवलत दिली जाते. यापूर्वी बोगस आधार कार्ड किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे सवलतींचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी होत्या. तसेच काही बोगस दिव्यांगांनी यूडीआयडी कार्डच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सवलतींचा गैरवापर रोखण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, हे कार्ड काढण्यासाठी आकारले जाणारे १९९ रुपयांचे शुल्क महिलांसाठी अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. ५ ते ७५ वयोगटातील महिलांना मिळणाऱ्या अर्ध तिकिटासाठीही कार्ड बंधनकारक केल्याने अनेक मुली आणि महिलांमध्ये नाराजी पसरली आहे.
महिलांना या शुल्कातून सूट द्यावी तसेच एनसीएमसी कार्डची सक्ती रद्द करावी, अशी मागणी आता परिवहन मंत्र्यांकडे करण्यात येत आहे.
एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे सवलत योजनांमध्ये पारदर्शकता येणार असली, तरी महिलांवरील अतिरिक्त आर्थिक भाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



