Latest NewsMaharashtra

गराशा गडावर राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सव जल्लोषात; विकासासाठी १५ लाखांची घोषणा

मेहकर (प्रतिनिधी): होळी म्हणजे रंग, आनंद आणि परंपरेचा सण… मात्र आदिवासी आणि विशेषतः बंजारा समाजासाठी हा उत्सव संस्कृती, एकता आणि परंपरेचा जिवंत वारसा मानला जातो. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील गराशा गड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाने संपूर्ण परिसर रंग, ढोल-ताशा आणि पारंपरिक नृत्याने दुमदुमून गेला.

बुलढाणा जिल्ह्यातील या ऐतिहासिक स्थळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो बंजारा बांधव एकत्र आले होते. बंजारा समाजामध्ये होळी सणाला विशेष महत्त्व असून परंपरेनुसार रंगांची उधळण, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि लोकगीतांनी गड परिसरात उत्साहाची लाट उसळली.

महिलांनी पारंपरिक लुगडे, जड दागिने आणि आकर्षक वेशभूषा परिधान करत संस्कृतीची झलक दाखवली, तर युवकांनी पारंपरिक पोशाखात नृत्य सादर करत वातावरण अधिक रंगतदार केले.

या महोत्सवाला आमदार सिद्धार्थ खरात यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी बंजारा समाजाच्या पारंपरिक नृत्यावर ठेका धरत उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.

यावेळी आमदार खरात यांनी गराशा गडाच्या विकासासाठी १५ लाख रुपयांच्या सभागृह उभारणीची घोषणा केली. या घोषणेमुळे समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील परंपरा, संस्कृती, एकता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. रंग, परंपरा आणि एकात्मतेची उधळण करणारा हा महोत्सव यंदाही संस्मरणीय ठरला.

गराशा गडावरील हा होळी महोत्सव बंजारा समाजाची समृद्ध परंपरा आणि ऐक्य जपत विकासाच्या नव्या आश्वासनासह उत्साहात पार पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button