‘ऑपरेशन थंडर’ची नागपुरात मोठी कारवाई; २१ लाखांहून अधिक किमतीचे एम.डी. ड्रग्ज जप्त

नागपूर: नागपूर शहरात गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत २१ लाखांहून अधिक किमतीचे एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून शहरातील ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
१ मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ यांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान सागर ताजु वानखेडे या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून १०५.६७० ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत २१ लाख १३ हजार ४०० रुपये इतकी आहे. तसेच आरोपीकडून ३ मोबाईल फोन, एक वजन काटा आणि करिश्मा दुचाकी असा एकूण २२ लाख ४२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमधील फरार साथीदाराचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून फरार आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.



