AmravatiLatest Newspolitics

२५० कोटींचा ठेका आणि शहर कचऱ्यात! मनपा सभेत तुफान हंगामा

अमरावती महानगरपालिकेच्या विशेष सभेत आज साफसफाईच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली… २५० कोटींच्या कोणार्क कंपनीच्या ठेक्यावरून सर्व पक्षांचे नगरसेवक संतप्त झाले… तब्बल एक तास चाललेल्या या सभेत प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला… मात्र ठोस निर्णय काहीही झाला नाही.

अमरावती शहरात वाढत्या कचऱ्याच्या आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेली मनपाची विशेष सभा चांगलीच गाजली. सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत कोणार्क कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी ठेक्याच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत दर महिन्याला अहवाल देण्याची मागणी केली. ४८ वाहनांच्या ऐवजी फक्त २२ वाहनांद्वारे कचरा उचलला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचीही मागणी करण्यात आली. काँग्रेसचे नगरसेवक धीरज हिंगसे यांनी नियम व अटींचे उल्लंघन होत असल्याचे सांगत मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री अपुरी असल्याचा मुद्दा मांडला. तर बबलू शेखावत यांनी मनपा प्रशासनावर ‘शहर लुटल्याचा’ गंभीर आरोप केला.

एमआयएम, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनीही आपल्या-आपल्या प्रभागातील कचऱ्याच्या समस्यांचा पाढा वाचला. रमजान महिन्यातही नियमित साफसफाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. गेल्या पाच वर्षांत साफसफाईसाठी तब्बल १२८४ कोटी रुपये खर्च होऊनही शहरात कचऱ्याचे ढीग असल्याने ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान सत्ताधारी गटनेते चेतन गावंडे आणि महापौर श्रीचंद तेजबानी यांनी प्रशासनाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

साफसफाईच्या प्रश्नावरून मनपाच्या सभेत झालेला हा गदारोळ शहरातील गंभीर परिस्थिती अधोरेखित करतो… कोट्यवधींचा खर्च होऊनही नागरिकांना स्वच्छता मिळत नसल्याने आता प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते… याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button