AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

विनाहेल्मेट आणि ट्रिपल सीट चालकांवर कारवाई

अमरावती, प्रतिनिधी : आगामी होळी, धुलिवंदन आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. चांदूर बाजार परिसरात झालेल्या या धडक मोहिमेत शेकडो वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखा आणि चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची सखोल तपासणी करण्यात आली.

या कारवाईत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ३ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे आणि मालवाहू वाहनातून मजुरांची धोकादायक वाहतूक करणे अशा विविध प्रकारांमध्ये एकूण १८९ प्रकरणे नोंदविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान तात्काळ २० हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून एकूण १ लाख ३३ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा वाहतूक शाखेने नागरिकांना हेल्मेटचा वापर करणे, भरधाव व निष्काळजीपणे वाहन न चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे न करणे तसेच मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक टाळण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


सणांच्या काळात सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नियम पाळा… सुरक्षित राहा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button