बेलतरोडीतील घरफोडीचा छडा; गुन्हेशाखा युनिट ०४ कडून दोन सराईत आरोपी अटकेत, ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नागपूर शहरातील बेलतरोडी परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक ०४ ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा यामुळे पर्दाफाश झाला आहे.
बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीतील सप्तगिरी नगर, प्लॉट क्रमांक १ व २ येथे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास नागपूर गुन्हेशाखा युनिट ०४ कडून सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नंदनवन परिसरातील के.डी.के. कॉलेज टी-पॉईंट येथे फिरत आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद आणि गोविंद काशीराम साखरे या दोघांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी आणखी एका साथीदारासह बंद घर हेरून घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, महत्त्वाची कागदपत्रे तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेला मोहम्मद जाकीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी, चोरी व चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या आरोपीवरही बॅटरी चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फरार आरोपीचा शोध सुरू असून या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांना मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बेलतरोडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. फरार आरोपीला लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.



