तिवसा तालुक्यात प्रहारचे अनोखे आंदोलन; शेतकऱ्यांच्या मुलांचे रक्तदान, रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र

तिवसा (जि. अमरावती) : कर्जमाफीच्या मागणीसाठी तिवसा तालुक्यात प्रहार संघटनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी रक्तदान करून त्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. ओला दुष्काळ, नापिकी आणि अपुरी मदत यामुळे शेतकरी हताश झाल्याचे चित्र आहे.
तिवसा तालुक्यातील मोझरी येथे प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने कर्जमाफीसाठी अभिनव आंदोलन करण्यात आले. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतर विसरली जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी उभे पीक शेतातच सडले. जे पीक हाती आले, ते कवडीमोल दरात विकावे लागले. परिणामी उत्पादन खर्चही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीकविमा आणि नुकसान भरपाईची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात अत्यंत तोकडी मदत मिळाल्याचा आरोप करण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर होऊनही कर्जमाफीबाबत सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी रायगड ते नागपूरदरम्यान विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
मोझरी येथे झालेल्या आंदोलनात ५५ शेतकऱ्यांच्या मुलांनी रक्तदान केले. या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तातडीने कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय सीमेवर कार्यरत जवान श्रीकांत प्रधान यांनीही रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
“आठवण कर्जमाफीची” या पदयात्रेच्या माध्यमातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात शांततामय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार कोणती भूमिका घेणार आणि कर्जमाफीसंदर्भात ठोस निर्णय होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



