International NewsLatest News

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला; तेल अवीवमध्ये स्फोट, अनेक जखमी

तेल अवीव/तेहरान : इराणने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात तेल अवीवसह अनेक भागांत जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले असून आकाशात धुराचे मोठे लोट पसरल्याचे वृत्त आहे. सलग हल्ल्यांमुळे इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ संरक्षण प्रणालीवर मोठा ताण निर्माण झाला असून लाखो नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर या संघर्षाला तीव्र वळण मिळाले आहे. त्यांच्या निधनानंतर इराणने इस्रायल तसेच पश्चिम आशियातील अमेरिकन लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागल्याची माहिती इराणी सरकारी माध्यमांनी दिली आहे.

इराणची शक्तिशाली लष्करी संघटना Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने या कारवाईला आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी मोहिम म्हटले आहे. खामेनेई यांच्या मृत्यूची मोठी किंमत इस्रायल आणि अमेरिकेला चुकवावी लागेल, असा इशाराही IRGC ने दिला आहे.

इराणकडून डझनावारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली. हल्ल्यादरम्यान राजधानी तेल अवीवमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि काही भागांत आकाश धुराने व्यापले गेले. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी Press TV ने प्रसारित केलेल्या चित्रफितींमध्ये तेल अवीवमधील एका महत्त्वाच्या लष्करी इमारतीजवळ धूर उसळताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा परिसर इस्रायलच्या जनरल स्टाफ मुख्यालयाजवळचा असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, अरबी वृत्तवाहिनी Al Arabiya च्या वृत्तानुसार, रविवारी तेल अवीवमध्ये सलग स्फोटांचे आवाज ऐकू आले. हे स्फोट इस्रायलच्या क्षेपणास्त्रविरोधी ‘आयर्न डोम’ प्रणालीने हवेतच इराणी क्षेपणास्त्रे निष्प्रभ करताना झाल्याचे सांगितले जात आहे.

या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button