AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत विहिरीत अज्ञात इसमाचा कुजलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

अमरावती : अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील छत्री तलाव ते हनुमान गडी मार्गावरील जंगल परिसरातील एका विहिरीत अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रविवार, दिनांक १ मार्च रोजी सकाळच्या सुमारास जंगल परिसरात काही मजूर कामासाठी गेले असता त्यांना विहिरीत एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन येथे माहिती दिली.

माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीसांचे पथक, फॉरेन्सिक लॅबची टीम तसेच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत आढळलेला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविणे कठीण झाले आहे.

सध्या मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही हत्या, अपघात की आत्महत्या याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. या प्रकरणातील गूढ लवकरच उलगडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button