भीषण अपघातानंतर ट्रकचा अग्निगोळा; तीन वाहने जळून खाक, एकाचा मृत्यू

झारखंड : झारखंड राज्यातील दुमका जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी भीषण रस्ता अपघात झाला. गोविंदपुर-साहिबगंज हायवेवर दोन वाहनांची जोरदार धडक झाल्यानंतर कंटेनर ट्रकला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
धडकेनंतर काही मिनिटांत आग भडकली
मिळालेल्या माहितीनुसार, सिगारेट लायटरने भरलेल्या ट्रकला मागून दगडांच्या चिप्सने भरलेल्या जड वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकमधील लायटरला आग लागली आणि काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. आगीचा वेग इतका प्रचंड होता की जवळ उभ्या असलेल्या आणखी दोन मालवाहू वाहनांनाही आगीने वेढले. पाहता पाहता तिन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर
माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीररीत्या भाजला गेला.
जखमीला प्रथम फूलो झानो मेडिकल कॉलेज अस्पताल येथे दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला बर्दवान येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून मृत आणि जखमी व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक तपासात मागून झालेली जोरदार धडक हीच आगीचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.



