नागपुरात गोवंशीय जनावरांवर क्रूरता, कत्तलीसाठी बांधलेली जनावरे जप्त

नागपूरमध्ये गोवंशीय जनावरांवर क्रूरतेची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पाचपावली परिसरात उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाणे पोलिसांचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की टेका नाई बस्ती परिसरातील चिराग अली चौक जवळ काही गोवंशीय जनावरे नाल्याच्या बाजूला बांधून ठेवण्यात आली आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
तेथे पोहोचल्यावर पोलिसांना एकूण ५ गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरतेने आणि निर्दयपणे एकमेकांना दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळली.
या जनावरांना चारापाणी न देता कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आले असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व जनावरे ताब्यात घेतली. या जनावरांची एकूण किंमत अंदाजे ८५ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सर्व गोवंशीय जनावरांना गोरक्षण केंद्र येथे सुरक्षितरित्या पाठवण्यात आले.
या प्रकरणी प्रशांत गायकवाड, पोउपनिरीक्षक, पाचपावली पोलीस ठाणे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.



