चंदीगडमधील तीन शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; शोधमोहीम सुरू

चंदीगड : Chandigarh शहरातील तीन प्रमुख शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाल्याने आज सकाळी एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर शाळा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-३८ येथील Vivek High School, Carmel Convent School आणि St. John’s High School या शाळांना ईमेलद्वारे धमक्या पाठवण्यात आल्या आहेत.
सध्या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षेच्या काळात अशा प्रकारची धमकी मिळाल्याने पालक आणि प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवण्यात आले.
धमकीची माहिती मिळताच पोलिस, बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड आणि गुप्तचर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तिन्ही शाळांमध्ये कसून तपासणी मोहीम सुरू असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सध्या तपास यंत्रणा धमकीचे ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.



