AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

विलासनगरमध्ये शिक्षणाचा गळा आवळला जातोय की घाणीचा? ‘हिंदी शाळा नंबर २’ परिसरात नरकयातना

अमरावती प्रतिनिधी :
अमरावती शहराच्या विकासाचे दावे केले जात असले तरी प्रभाग क्रमांक ६ मधील विलासनगर, मोरबाग आणि गवळीपुरा परिसराने स्वच्छतेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. येथील हिंदी शाळा क्रमांक २ आणि लगतच्या बजरंग टेकडी मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

📚 मुलांच्या आरोग्याशी खेळ?

शाळेची अधिकृत पटसंख्या सुमारे ७० विद्यार्थ्यांची असताना, परिसरातील असह्य दुर्गंधीमुळे प्रत्यक्ष उपस्थिती ४० ते ४२ वर घसरल्याची माहिती समोर येत आहे. नाल्यातील मेलेली जनावरे, साचलेला कचरा आणि सार्वजनिक शौचालयातून येणारी दुर्गंधी यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण झाले आहे.

एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या घोषणा दिल्या जातात, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थिनींना अशा अस्वच्छ वातावरणात शिक्षण घ्यावे लागत असल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत.

🏛️ लोकप्रतिनिधी गायब?

२० फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत स्वच्छतेच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाल्याचे सांगितले जात असले तरी मोरबाग प्रभागात त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. नव्याने निवडून आलेल्या चारही नगरसेवकांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र निवडणुकीनंतर हे लोकप्रतिनिधी प्रभागात फिरकत नसल्याची संतप्त भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

❗ प्रशासनाला जाग येणार कधी?

परिसरातील घाणीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून, शाळकरी मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून नालेसफाई, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

“विकासाच्या घोषणा पुरेशा नाहीत… शिक्षण आणि आरोग्य वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कृती हवी!”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button