BhandaraLatest NewsMaharashtra

घोषणांमध्ये ‘डिजिटल शाळा’… पण सायतानगरमध्ये वर्गच नाही!

भंडारा प्रतिनिधी :
सायतानगर (ता. पवनी) येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक ठरल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाहणीनंतर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला; अधिकाऱ्यांनी भेट देत “नवीन इमारतीचे काम तातडीने सुरू करू” असे आश्वासन दिले. मात्र दोन आठवडे उलटूनही प्रत्यक्ष कामाची सुरुवात झालेली नाही.

अंगणवाडीतच शिक्षण

सध्या विद्यार्थ्यांना शेजारच्या अंगणवाडीत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. एका छोट्याशा खोलीत अंगणवाडीतील लहान मुले आणि प्राथमिक शाळेतील मोठे विद्यार्थी एकत्र बसत असल्याने गोंगाट, जागेची कमतरता आणि बसण्याची गैरसोय निर्माण झाली आहे. पालकांच्या मते, या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

वीजही खंडित

शाळेचे वीज बिल थकले असल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. उष्णता आणि अंधारात मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. ‘डिजिटल शाळा’ आणि ‘गाव तिथे शाळा’ अशा घोषणांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिकच प्रश्न निर्माण करणारी ठरते.

प्रशासनाची प्रतीक्षा

जिल्हा परिषद भंडारा आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून काम लवकर सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही.

पालकांनी इशारा दिला आहे — “आता आश्वासन नकोत… काम सुरू करा! अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.”

मुलांच्या भवितव्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रशासन कितपत गांभीर्य दाखवते आणि सायतानगरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शाळा केव्हा मिळते, याकडे संपूर्ण भंडाऱ्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button