अमरावतीत दरवळणार गुलाबांचा सुगंध; चार दिवसांचा रंग, सौंदर्य आणि प्रेरणेचा उत्सव

अमरावती प्रतिनिधी :
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रोज गार्डन, आय एम ए हॉललगत चार दिवसीय गुलाब उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान हा उत्सव दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला असणार आहे.
अमरावतीकरांना गुलाबाच्या विविध प्रजातींची ओळख व्हावी तसेच त्यांच्या संवर्धनाचा संदेश मिळावा, या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. गार्डनमध्ये शेकडो गुलाबांची झाडे मांडण्यात आली असून लाल, पिवळा, पांढरा, केशरी आदी विविध रंगांच्या आकर्षक प्रजाती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. फुलांच्या रांगोळ्या, सजावटीचे आराखडे आणि सुबक मांडणीमुळे संपूर्ण परिसर सुगंधित व रंगीबेरंगी झाला आहे.
या गुलाब उत्सवानंतर प्रदर्शनातील झाडांचे याच ठिकाणी प्रत्यारोपण करण्यात येणार असून, नागरिकांना वर्षभर या फुलांचा आनंद घेता येणार आहे.
उत्सवाचे उद्घाटन अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त सोम्या शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच नागरिकांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव निर्माण झाला आहे. 🌸



