Crime NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपूरच्या पाचपावलीत घरफोडीचा गुन्हा उघड; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन सराईत आरोपी अटकेत

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. चोरीतील मुद्देमालासह दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हाडकरपेठ येथील बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या फिर्यादी वंदना पराते या सायंकाळी चार वाजता घरी परतल्या असता त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता.

या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांचे पथक लष्करीबाग – कलकत्ता रेल्वे लाईन परिसरात पेट्रोलिंग करत असताना नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या बर्गमन दुचाकीवर दोन संशयित इसम आढळले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर (वय २३) आणि फलांश चेतन भीमटे (वय १९) अशी आरोपींची नावे समोर आली. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडून चोरीतील मंगळसूत्र, रोख रक्कम तसेच बर्गमन दुचाकी असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी १९ फेब्रुवारी रोजी घरफोडी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात उर्वरित सोन्याची नथ व अंगठी देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपींना अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजीत माजगावकर करीत आहेत.


पाचपावली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button