गाडगेनगर परिसरात मोठी चोरी

अमरावती | स्पेशल रिपोर्ट
“न्याय देणाऱ्यांच्याच घरात चोरी… आणि १० दिवस उलटूनही तपासाचा थांगपत्ता नाही! अमरावतीत नेमकं सुरू काय आहे?”
अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कांता नगरसेवक परिसरात तब्बल पाच न्यायाधीश आणि चार कर्मचाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांनी धाड टाकल्याची धक्कादायक घटना दहा दिवसांपूर्वी उघडकीस आली.
न्यायव्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, घटनेला दहा दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची चर्चा आहे.
चोरटे नेमके कोण? तपास कुठवर पोहोचला? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे, याच गाडगेनगर हद्दीत काही दिवसांपूर्वी एका सोनाराला लुटण्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत लावून आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले होते.
मात्र, त्याच पत्रकार परिषदेत न्यायाधीशांच्या घरफोडीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, “नो कमेंट” असे उत्तर देण्यात आल्याची माहिती आहे.
यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. न्यायाधीशांच्या घरातच चोरी होत असेल, तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कितपत सुरक्षित आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तपासासाठी केवळ स्थानिक गुन्हे शाखाच जबाबदार आहे का? संबंधित पोलीस ठाण्याचे डीबी पथक आणि गुप्तवार्ता विभाग काय करत आहे? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दहा दिवस उलटले तरी तपासाबाबत अधिकृत माहिती नसल्याने अमरावतीकर उत्तरांची प्रतीक्षा करत आहेत.
“न्याय देणाऱ्यांच्या घरात चोरी… आणि तपासावर मौन.”
अमरावती पोलिसांसमोर आता विश्वास टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचा उलगडा नेमका कधी होणार, हा प्रश्न आज संपूर्ण शहर विचारत आहे.



