Latest NewsMaharashtraMelghat

कोट्यवधींचा रस्ता… पण वर्षातच खड्ड्यात! मेळघाटातील बारातांडा–धुळघाट मार्गावर नागरिकांचा संताप

अमरावती | विशेष प्रतिनिधी

“कोट्यवधींचा रस्ता… पण वर्षातच खड्ड्यात! मेळघाटात विकास ‘होले होले चलो’च्या गतीनेच?”

मेळघाटातील बारातांडा–धुळघाट रेल्वे मार्गावरील सुमारे दहा किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असले तरी कामाची गती आणि गुणवत्ता यावरून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संथगतीमुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला ‘संथगती एक्सप्रेस’ अशी उपमा दिली आहे.

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला तरी रस्ता अद्याप पूर्णत्वाला गेलेला नाही. उलट नव्याने केलेल्या डांबरीकरणातच खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.

सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असले तरी अनेक ठिकाणी माहिती फलकच नसल्याची तक्रार आहे. खर्च, कालावधी आणि तांत्रिक तपशील याबाबत ग्रामस्थांना कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे सांगितले जाते. “इकडे बनतो, तिकडे उखडतो; हा रस्ता आहे की प्रयोगशाळा?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर धारणी–बैरागड, धारणी–टिटंबा, धारणी–बिजूधावडी आणि घाटमार्गांवरील रस्त्यांबाबतही अशाच तक्रारी समोर येत आहेत. निकृष्ट साहित्य आणि कामातील विलंबामुळे निधी ‘डांबरात विरघळतोय’ अशी चर्चा रंगली आहे.

अलीकडेच घाट परिसरात खराब रस्त्यामुळे पिकअप वाहन उलटून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खड्डे, धोकादायक वळणं आणि अपूर्ण काम यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रलंबित देयकांमुळे ठेकेदाराने कामाचा वेग कमी केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. “निधी अडकला की रस्ता अडकतो,” असा टोला ग्रामस्थांनी लगावला आहे.

कोट्यवधींचा खर्च करूनही सुरक्षित आणि टिकाऊ रस्ता मिळत नसेल, तर जबाबदारी नेमकी कोणाची? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

मेळघाटातील रस्ते विकासाची गाथा ‘होले होले चलो’वरच अडकणार की खऱ्या अर्थाने वेग घेणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button