कामरगावमधील दूषित पाणीप्रश्न प्रशासनाच्या रडारवर; पाहणीत ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड

वाशिम | प्रतिनिधी
कामरगावमध्ये दूषित पाणीपुरवठ्याचा गंभीर मुद्दा अखेर प्रशासनाच्या रडारवर आला आहे. सिटी न्यूजच्या धडाकेबाज वृत्ताची दखल घेत तालुका आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी थेट गावात दाखल झाले आणि प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ग्रामपंचायतीच्या कारभारातील गंभीर त्रुटी समोर आल्या.
आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील बोअरवेल, सार्वजनिक विहिरी आणि पाणीपुरवठा केंद्रांची सखोल पाहणी केली. मात्र या पाहणीत विहिरींच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता, साचलेले सांडपाणी, दुर्गंधी आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव आढळून आला. या परिस्थितीवर अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाण्यात नारूसदृश अळ्या आणि जिवंत सूक्ष्म जीव तरंगताना आढळले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने पाण्याचे नमुने आणि अळ्या तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा येथे पाठवले आहेत.
त्यानंतर आरोग्य पथकाने युद्धपातळीवर कारवाई करत गावातील सर्व विहिरी आणि बोअरवेलमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवली.
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनातील आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. गावातील कचरा उघड्यावर पेटवला जात असल्यामुळे धूर संपूर्ण गावात पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून “सिटी न्यूजमुळेच प्रशासन जागे झाले,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
कामरगावमधील पाणीप्रश्नाने ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लॅब रिपोर्ट काय सांगतो? दोषींवर कारवाई होणार का? आणि ग्रामस्थांना शुद्ध पाणी कधी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



