साकोलीत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; १४ जण जखमी

भंडारा | प्रतिनिधी
साकोली शहर आणि जांभळी परिसरात मोकाट व बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी घडलेल्या घटनेत तब्बल १४ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भंडारा जिल्हा अंतर्गत साकोली तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. साकोली शहरासह जांभळी परिसरात आज सकाळी कुत्र्यांनी अचानक नागरिकांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात बिपीन दिवाकर (वय ३५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हात व पायाला चावा लागला आहे. त्यांच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काजल डोंगरवार, रवींद्र नंदेश्वर, दुर्गेश चव्हाण, होमराज भुरे, आकाश तिवारी आणि सुरेंद्र पाटील हेही जखमी झाले आहेत.
दरम्यान, जांभळी सडक परिसरात मंगलदास तिरपुडे, सुनील रामटेके, राहुल बागडे, नरेंद्र रामटेके, मयूर बेंदवार, सरोज मेश्राम आणि अजय फुंडे या नागरिकांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षभरापासून साकोली परिसरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
साकोली-शेंदूरवाफा नगरपरिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा वाढता धोका आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे साकोलीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर प्रशासन नेमकी काय कारवाई करते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



