India NewsLatest Newspolitics

शेगावात राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६; राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कडक

शेगाव | प्रतिनिधी

शेगाव येथे येत्या २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ आणि द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः शेगावात येऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमस्थळ, राष्ट्रपतींच्या आगमनासाठी तयार करण्यात येत असलेले हेलिपॅड तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. आयुष मंत्रालय यांच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात विविध पॅथींचे स्टॉल्स, औषध वितरण केंद्र, तसेच रुग्ण तपासणीसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि तपासणी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या तयारीबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस दलातून एकूण ३४ अधिकारी आणि २१५ कर्मचारी शेगावमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, बीडीडीएस पथक, एपीआय-पीएसआय, महिला पोलीस तसेच ट्रॅफिक पोलीस यांचा समावेश आहे. दौऱ्याच्या तीन दिवस आधीच हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दौरा संपेपर्यंत तो कायम राहणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शन घेणार असल्याने संपूर्ण परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार आहे. आता या मेळाव्याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button