नागपूर मार्गावर ५०५ किलो गांजा जप्त; एंटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धडक कारवाई
नागपूर, प्रतिनिधी :
नागपूर मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीवर एंटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने मोठी कारवाई करत तब्बल ५०५ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची बाजारातील किंमत सुमारे २ कोटी ५३ लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना पहाटे पाच वाजताच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की संबलपूर येथून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप नागपूर मार्गे मुंबईकडे पाठवली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली एंटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे पथक मौदा टोल नाका परिसरात दाखल झाले.
टोल नाक्यापासून काही अंतरावर एका ढाब्याजवळ उभा असलेला डब्ल्यू बी 23 डी 7992 क्रमांकाचा बाराचाकी ट्रक संशयास्पद अवस्थेत आढळला. ट्रक चालक संजय यादव (वय ३४, रा. गया – बिहार) याची चौकशी केली असता त्याने संबलपूरहून लोखंड घेऊन मुंबईला जात असल्याचे सांगितले. मात्र ट्रकची सखोल तपासणी केली असता २० प्लास्टिक बोर्यांमध्ये लपवून ठेवलेला ५०५ किलो गांजा आढळून आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर मार्गाचा वापर करून आंतरराज्यीय तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून प्लास्टिकच्या बोर्यांमध्ये गांजा भरून मुंबईकडे पाठवला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मिळत असलेल्या गुप्त माहितीनुसार मौदा टोल नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांवर विशेष नजर ठेवण्यात येत होती. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी मोठी कारवाई असून यापूर्वी सावनेर नाक्यावर केंद्रीय राजस्व गुप्तचर संचालनालयाने ५०० किलो गांजा जप्त केला होता.
अंमली पदार्थांविरोधातील या कारवाईमुळे नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आंतरराज्यीय तस्करीच्या रॅकेटवर आणखी कारवाई होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



