नागपूरमध्ये खंडणीखोराला अटक; वाठोडा पोलिसांची धडक कारवाई

नागपूर, प्रतिनिधी :
नागपूर शहरात खंडणी मागणाऱ्या गुंडांवर वाठोडा पोलीस ठाणे यांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. चहाच्या दुकानात घुसून तोडफोड करत दर महिन्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरबी परिसरातील पायल वाईन शॉपजवळ “कन्फर्ट ऑफ चाय नं. २” या चहाच्या दुकानात ही घटना घडली. फिर्यादी किशोर नारायण गुरव (वय ७४) हे दुकानात असताना आरोपी सचिन रूपचंद वासनिक व त्याचा साथीदार प्रणय बेसरकर दुकानात आले. दोघांनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ केली, दुकानाच्या काऊंटरची तोडफोड केली आणि दुकान चालवायचे असल्यास दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), २९६, ३५१(३), ३२४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर तात्काळ तपास सुरू करून आरोपी सचिन वासनिक याला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खंडणीखोरांवर पोलिसांचा धाक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
खंडणीखोरांविरुद्ध वाठोडा पोलिसांची ही धडक कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अटक केलेल्या आरोपीची पुढील चौकशी सुरू असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. नागपूरमधील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.



