Latest NewsMaharashtraNanded

अर्धापूर तहसील कार्यालयात तलाठी गैरहजर; नागरिकांची गैरसोय वाढली

नांदेड, प्रतिनिधी :
अर्धापूर तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कार्यालयीन वेळ सुरू होऊनही तलाठी आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कामासाठी तासन्‌तास वाट पाहूनही अधिकारी न भेटल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सकाळी साडेदहाला कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात साडेअकरा वाजूनही तलाठी कार्यालयाचे कुलूप उघडले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध शासकीय कामांसाठी, विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसाठी, तलाठ्यांची भेट आवश्यक असते. परंतु कार्यालयात कोणीही नसल्याने नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

महिला, शेतकरी आणि विद्यार्थी यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे. अनेकदा दिवसभर प्रतीक्षा करूनही काम न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. स्थानिकांच्या मते, तलाठी व सेवक कर्मचारी नेहमीच उशिरा येतात किंवा गैरहजर असतात. त्यामुळे शासनाच्या ‘वेळेत सेवा’ या संकल्पनेलाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, आमदार तसेच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


अर्धापूर तहसील कार्यालयातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button