१०२ रुग्णवाहिका चालकांचे ‘चलो मुंबई’ आंदोलन; आझाद मैदानावर राज्यव्यापी चक्काजाम

रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणारे आणि जीव वाचवण्यासाठी धावणारे १०२ रुग्णवाहिका चालक आता स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेकडो चालकांनी ‘चलो मुंबई’चा नारा देत मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन छेडले आहे.
वाशिम जिल्हा येथील ‘संघर्ष शासकीय वाहन चालक संघटना’च्या वतीने सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आझाद मैदान येथे मोठे आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने आणि तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असलेल्या १०२ रुग्णवाहिका चालकांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे.
‘एकच नारा – कायम करा’ अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो चालक सहभागी झाले असून, राज्यभरातूनही या लढ्याला पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले.
चालकांच्या प्रमुख मागण्या :
✔ १० वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या चालकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समावेश
✔ ‘समान काम, समान वेतन’ तत्वावर ३४,५०० रुपये वेतन
✔ उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकबाकीची रक्कम तातडीने देणे
✔ कर्तव्यावर मृत्यू झाल्यास वारसाला शासकीय नोकरी आणि २० लाखांची मदत
✔ दर महिन्याच्या १ तारखेला नियमित वेतन
✔ आकृतीबंधातील पदाचे सर्व लाभ लागू करणे
“आम्ही रुग्णांचे जीव वाचवतो, मात्र आमचे भविष्य असुरक्षित आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे वाशिम जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुग्णांसाठी धावणाऱ्या या चालकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन लक्ष देणार का? आणि या आंदोलनातून कोणता तोडगा निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



