पाटणसावंगी येथे भाच्याने मामाचा कुऱ्हाडीने खून; आरोपी अटकेत
नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पाटणसावंगी येथे उघडकीस आली आहे. मामाचाच भाच्याने कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की, भाच्याने मामावर जीवघेणे वार करत त्याचा जागीच खून केला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे रविवारी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव केसरी गज्जू कावरे (वय ५०, रा. झालाघाट, मध्यप्रदेश) असे असून आरोपी भाचा सूर्यकांत कलाराम नागेश्वर (वय २९, रा. पाटणसावंगी) असा आहे.
दोघांनी एकत्र बसून दारू सेवन केले होते. त्यानंतर किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद चिघळत गेल्याने संतापलेल्या सूर्यकांतने कुऱ्हाड, टिकास आणि लोखंडी सळईने मामाच्या डोक्यावर व छातीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात केसरी कावरे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हितज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष हितेशदादा बनसोड घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येसाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दारूच्या नशेतून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याने नात्यांमधील वाढता तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. पाटणसावंगी येथील या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.



