राहुल नगरमध्ये अश्रूधूरसदृश धूर पसरल्याने खळबळ; पोलिसांची धावपळ, दोन अल्पवयीन ताब्यात

फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल नगर परिसरात आज दुपारी अचानक अश्रूधूरसदृश धूर पसरल्याने एकच खळबळ उडाली. घरातील नागरिक सैरावैरा पळाले, तर रस्त्याने जाणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पोलिसांसह बॉम्ब शोध पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धावपळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नगर परिसरात अचानक तीव्र धूर पसरला. डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. धुराचा परिणाम तब्बल शंभर मीटर परिसरात जाणवत होता.
प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, एका अल्पवयीन मुलाला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ (एसआरपीएफ) च्या मैदानावर ड्रेनेजमध्ये डमी अश्रूधूरचा कॅन सापडला. तो मुलगा तो कॅन घरी घेऊन आला आणि उत्सुकतेपोटी तोडल्याने त्यातून अश्रूधूर बाहेर पडला.
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सिरसाठ हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त धुमाळ यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य धोका लक्षात घेऊन बॉम्ब शोध पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ परिसर सील करून नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले.
या प्रकरणी चौकशीसाठी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना सोबत घेऊन पोलीस एसआरपीएफ गट क्रमांक ९ च्या मैदानावर तपासासाठी गेले आहेत. दरम्यान, घटनास्थळी शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. डमी अश्रूधूरचा कॅन ड्रेनेजमध्ये कसा आला, याचा तपास सुरू आहे.
राहुल नगरमध्ये पसरलेल्या अश्रूधूरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून डमी अश्रूधूर येथे कसा पोहोचला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



