Latest NewsMaharashtraNagpur

नागपुरात देशी पिस्टलसह तरुण अटकेत; पाचपावली पोलिसांची धडक कारवाई

नागपूर शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी एका तरुणाला देशी बनावटीच्या पिस्टलसह अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.


पाचपावली पोलीस ठाणे येथील तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने पाचपावली परिसरातील पहिले रेल्वे फाटकाजवळ दिवटे देशी भट्टीसमोर सापळा रचला.

संशयित इसमाला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव सय्यद मजाहीर अली जाफरी (वय २३ वर्षे, रा. शांतीनगर, मुदलीयार चौक, नागपूर) असे सांगितले. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेत देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. या अग्नीशस्त्राची अंदाजे किंमत १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान आरोपीने हे अग्नीशस्त्र त्याचा साथीदार शाहरूख खान (वय ३० वर्षे, रा. ताजनगर, टेका नागपूर) याच्या मदतीने आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून एक देशी पिस्टल आणि एक मोबाईल फोन असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्नीशस्त्र बाळगत असल्याचा संशय असल्याने तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागपूर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरात घडू शकणारा संभाव्य गंभीर गुन्हा टळला आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button