लातूर हादरलं! ८ एकर शेतीच्या वादातून लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या

लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव गुलाब विलास खरोसे (वय ३४) असे असून आरोपीचे नाव उल्हास खरोसे आहे. दोघेही सख्खे भाऊ होते. वडिलांकडून मिळालेल्या ८ एकर शेतीच्या वाटणीवरून मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. हा वाद इतका टोकाला गेला की त्यातून थेट खुनाची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास गुलाब खरोसे शेताकडे जात असताना उल्हास खरोसे हा आधीच रस्त्यात दबा धरून बसला होता. गुलाब तेथे पोहोचताच उल्हासने त्याच्यावर अचानक हल्ला केला. दोरीने गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेजारील नाल्यात फेकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच कासार-शिरशी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्याकांडामुळे रामलिंग मुदगड गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलीस करत असून घटनेमागील इतर कारणांचाही शोध घेतला जात आहे.



