मोर्शीत भूमी अभिलेख विभागाचा जनता दरबार

सातबारा, फेरफार व मोजणीसह मालमत्ता प्रश्नांवर तात्काळ सुनावणी
मोर्शी : शेतकरी तसेच शहरातील नागरिकांच्या जमीन व मालमत्ता नोंदी संदर्भातील प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मोर्शीच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या जनता दरबाराला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.
सातबारा, फेरफार व नकाशे प्रश्नांवर थेट सुनावणी
जनता दरबारामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांतील त्रुटी, फेरफार, जमीन मोजणी, नकाशे यांसह शहरातील मालमत्तेशी संबंधित विविध प्रकरणांवर थेट अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. अनेक प्रलंबित प्रकरणांचे तत्काळ मार्गदर्शन करून निराकरण करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावतीचे महेशकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख मोर्शी अविनाश दशरथकर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
‘एकाच ठिकाणी समाधान’ हा उद्देश
नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी मार्गी लागाव्यात, हा या जनता दरबारामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.



