Latest NewsMaharashtra

नागपूर खापरखेड्यात थरारक शोधमोहीम; रात्रभर शाळेत कोंडलेला 4 वर्षांचा हिमांशू सकाळी सुखरूप सापडला

नागपूर : खापरखेडा परिसरात एक धक्कादायक पण दिलासादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता शाळेच्या खोलीत गेलेला चार वर्षांचा हिमांशू बागडे हा चिमुकला रात्रभर शाळेतच कोंडला गेला होता. संध्याकाळपासून मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी अपहरणाची भीती व्यक्त केली होती, मात्र अखेर सकाळी तो सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बोरकर लेआउट परिसरातील हिमांशू दुपारी घराजवळील बालवाडीत खेळता खेळता गेला. मागील खोलीत जाऊन तो थकव्यामुळे झोपून गेला. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी फक्त समोरील खोली तपासून इमारतीला कुलूप लावले. त्यामुळे हिमांशू रात्रभर आतच अडकून राहिला.

संध्याकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत मुलगा घरी न परतल्याने आईने नातेवाईकांना माहिती दिली. परिसरात शोधाशोध सुरू झाली; मात्र काहीच सुगावा लागला नाही. वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सात पथके तयार करून रात्रभर शोधमोहीम राबवली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच तलाव, नाले, झाडी-झुडुपे आणि आसपासच्या परिसरात कसून शोध घेण्यात आला.

मुलगा सापडत नसल्याने कुटुंबीयांची अवस्था चिंताजनक झाली होती. आईचा आक्रोश आणि वडिलांची अस्वस्थता पाहून परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, सकाळी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी शाळेची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले. खोलीचे कुलूप उघडताच आत हिमांशू शांत झोपेतून उठलेला अवस्थेत सुखरूप आढळला. रात्रभर बंद खोलीत राहूनही तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर पोलिसांनी शाळा व बालवाडी प्रशासनाला कुलूप लावण्यापूर्वी प्रत्येक खोलीची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button